Tuesday, November 23, 2021

मुंबईकरांसाठी खुशखबर : आता UTS अ‍ॅपवरुन तिकीट, पास काढता येणार

मुंबई आणि परिसरातून लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. आज मध्यरात्रीपासून Unreserved Ticketing System – UTS या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकल प्रवासासाठी तिकीट आणि पास उपलब्ध होणार आहे. करोनाची लाट सुरु झाल्यावर सर्वसमान्यांच्या लोकल प्रवासावर बंधने आणण्यात आली होती. यामध्ये UTS अ‍ॅपमधून तिकीट आणि पास मिळण्याची सेवा सुद्धा बंद करण्यात आली होती. अखेर ही सेवा पुन्हा सुरु करण्यात येत आहे.

रेल्वेने UTS अ‍ॅप हे युनिवर्सल पासशी लिंक केलं आहे. लशीचे दोन डोस होत १४ दिवस पुर्ण झालेल्या नागरीकांनाच युनिवर्सल पास राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला जातो. तेव्हा आता रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटवर जाण्याऐवजी मोबाईवरच लोकल ट्रेनसाठी तिकीट आणि पास काढणे शक्य होणार आहे. उद्यापासून ही सुविधा सुरु होणार आहे असं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी स्पष्ट केलं आहे.

ऑगस्ट महिन्यापासून लसीकरण झालेल्या लोकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली होती. असं असलं तरी गर्दी टाळण्यासाठी तिकीट सुविधा सुरु करण्यात आली नव्हती. यामुळे सर्वसामान्य लोकांनी याबद्द्ल संताप व्यक्त केला होता. त्यानंतर युनिवर्सल पास असलेल्यांना तिकीट सुविधा सुरु करण्याचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आला. असं असलं तरी तिकीट काऊंटवर गर्दी वाढत होती, ही गर्दी कमी करण्यासाठी आता UTS अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट आणि पास उपलब्ध करुन देण्याची सुविधा सुरु करण्यात येत आहे.

मुंबई आणि परिसरात पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर दररोज एकुण ८० लाखांपेक्षा जास्त प्रवासी हे लोकल ट्रेनने प्रवास करतात. यापैकी १० टक्के प्रवासी हे UTS अ‍ॅपचा वापर करतात असा अंदाज आहे.

The post मुंबईकरांसाठी खुशखबर : आता UTS अ‍ॅपवरुन तिकीट, पास काढता येणार appeared first on Loksatta.



from वृत्तान्त – Loksatta https://ift.tt/3xdYlw6
via IFTTT

No comments:

Post a Comment